‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेद्वारे प्रभावी सर्वेक्षण करून मोहीम यशस्वी करावी : जिल्हाधिकारी सूरज मांढरे
वृत्त क्र. C-368
‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेद्वारे प्रभावी सर्वेक्षण करून मोहीम यशस्वी करावी
: जिल्हाधिकारी सूरज मांढरे
नाशिक, 12 ऑक्टोबर 2020 (जिमाका वृत्तसेवा)
कोरोनाच्या आपत्तीला अटकाव करण्यासाठी "माझे कुटुंब माझी जबाबदारी" या मोहिमेद्वारे प्रभावी सर्वेक्षण करणे करूनच संसर्ग रोखण्याच्या दृष्टीने अत्यावश्यक आहे. या सर्वेक्षणाद्वारे प्रत्येक कुटुंबात कोणाला काही आजार आहे का याची चाचपणी करून संबंधितांवर वेळीच उपचार करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आपत्कालीन कार्य केंद्राच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र शिंदे, उपजिल्हाधिकारी वासंती माळी, अरविंद अंतुर्लीकर, निलेश श्रींगी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ रत्ना रावखंडे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीनिवासन, डॉ.निखिल सैंदाने, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.दावल साळवे, महानगरपालिकेचे सहायक आरोग्य अधिकारी डॉ प्रशांत शेटे, जिल्हा उद्योग व्यवस्थापक सतीश भामरे, जिल्हा नियोजन अधिकारी देवेंद्र चौधरी आदी उपस्थित होते.
यावेळी माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेचे टप्पा 2 मधील सर्वेक्षणाची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी जिल्हाधिकारी श्री. मांढरे यांनी समन्वयक अधिकारी म्हणून नाशिक ग्रामीणसाठी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे, मालेगावसाठी उपजिल्हाधिकारी अरविंद अंतुर्लीकर आणि नाशिक महानगरपालिका क्षेत्रासाठी सहायक वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत शेटे यांची नेमणूक केली आहे.
यावेळी जिल्हाधिकारी श्री.मांढरे यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात कंत्राटी कर्मचाऱ्याने रेमडीसीविर औषधाबाबत केलेल्या काळाबाजाराबाबत जिल्हा शल्यचिकित्सक रत्ना रावखंडे, जिल्हा विधी अधिकारी ऍड. हेमंत नागरे यांच्यासोबत चर्चा करून संबंधितांवर तात्काळ गुन्हा दाखल करण्याबाबत सांगितले. या प्रकरणाचा सखोल तपास करून ज्यांचा समावेश या प्रकरणात असेल त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचेही जिल्हाधिकारी श्री. मांढरे यांनी यावेळी सांगितले.
पुढे बोलताना जिल्हाधिकारी श्री. मांढरे म्हणाले, योग्य नियोजन केल्यामुळे जिल्ह्यात ऑक्सिजनचा साठा मुबलक झाला आहे. त्यामुळे आता उद्योगांना मागणीनुसार ऑक्सिजन सिलेंडर पुरविण्यात येतील. तसेच रेमडीसीविर औषधाबाबत करण्यात आलेल्या कठोर मूल्यमापनामुळे जिल्ह्यात औषधसाठा मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे; तरीदेखील सध्या सुरू असलेली मूल्यमापन पद्धत कायमस्वरूपी राहील याची दक्षता घेण्यात यावी.
महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजनेमधून रुग्णांना लाभ मिळावा यासाठी शासकीय रुग्णालये तसेच खाजगी रुग्णालयांनी देखील प्राधान्याने प्रयत्न करावे. मनमाड आणि सुरगाणा येथे आवश्यक असलेल्या विशेष कोव्हीड आरोग्य केंद्र (डीसीएचसी) तयार करण्याबाबत प्राधान्याने लक्ष देण्याबाबतच्या सूचना यावेळी जिल्हाधिकारी श्री. मांढरे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या
00000000000



Comments
Post a Comment