नव्याने रुजू होणाऱ्या तलाठ्यांनी अभ्यासू वृत्ती अंगी बाणवून दर्जेदार काम करावे : जिल्हाधिकारी सूरज मांढरे

 वृत्त क्र. C-367   दि. 12 ऑक्टोबर 2020   


नव्याने रुजू होणाऱ्या तलाठ्यांनी अभ्यासू वृत्ती अंगी बाणवून दर्जेदार काम करावे

: जिल्हाधिकारी सूरज मांढरे

जिल्ह्यातील ६७ तलाठ्यांच्या प्रशिक्षण वर्गाला सुरुवात


नाशिक, 12 ऑक्टोबर 2020 (जिमाका वृत्तसेवा):

महसूल प्रशासनातील तलाठी या पदाचा जनतेशी प्रत्यक्ष संबंध असतो. तलाठी हा जनतेसाठी प्रशासनाचा प्रतिनिधी म्हणून कार्यरत असतो; त्यामुळे शासकीय सेवांमध्ये तलाठी म्हणून रुजू होताना थेट पदभार न देता संबंधित तलाठ्यांना योग्य ते प्रशिक्षण देण्याचा निर्णय नाशिक जिल्हाधिकारी श्री सुरज मांढरे यांनी घेतला असून त्याप्रमाणे नवनियुक्त तलाठ्यांचा एक आठवड्याचे प्रशिक्षण कार्यक्रम आज जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात सुरू झाला. 


सर्व तलाठ्यांनी अभ्यासू वृत्ती अंगी बाणवून नागरिकांना उत्तम सेवा देण्यासाठी सतत कार्यरत राहावे असे श्री मांढरे म्हणाले. जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणातील नियोजन भवन येथे सुरू असलेल्या 2020 या बॅचच्या ६७ तलाठ्यांच्या पाच दिवसीय प्रशिक्षण वर्गाला दिलेल्या भेटीप्रसंगी ते बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे, उपजिल्हाधिकारी बबन काकडे, प्रशिक्षण वर्ग समन्वयक उपजिल्हाधिकारी गणेश मिसाळ, तहसीलदार राजेंद्र नजन उपस्थित होते.


यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी श्री. मांढरे म्हणाले, तलाठी यांचा संबंध प्रत्यक्ष गावकऱ्यांशी येतो त्यामुळे आपल्या खात्याची प्रतिमा उंचविण्याची जबाबदारी या पदावरील व्यक्तीवर खऱ्या अर्थाने आहे. हे पद म्हणजे जनतेला सेवा देणारी संधी आहे. प्रशासनात असताना आपल्यामार्फत कोणाच्या हिताचे काम होत असेल तर त्याला प्राधान्य द्या. अनुभवी अधिकारी, कर्मचारी यांकडून जेवढे शिकता येईल तेवढे शिका. नव्या युगात वावरताना शासकीय सेवांना तंत्रज्ञानाची जोड देऊन कामे करायला प्राधान्य द्या. सोशल मीडियाचा चांगल्या प्रकारे वापर करत असताना व्हाट्सअप्प टेलिग्राम यांसारख्या संवादात्मक अप्लिकेशनचा वापर करण्याचे जिल्हाधिकारी श्री. मांढरे यांनी नमूद केले.


कोणत्याही कार्यासाठी प्रशिक्षण देणे याचा अर्थ आतापर्यंत केलेल्या अभ्यासाची वास्तविक जीवनामध्ये सुयोग्य अंमलबजावणी करण्यासाठी दिलेली दिशा होय. पदावर कार्यरत असताना भविष्यात येणाऱ्या अडीअडचणी तसेच जनतेशी समरूप राहणे हा उद्देश समोर ठेवून प्रत्यक्षिकांचे नियोजन करण्यात आले असल्याची माहितीही यावेळी जिल्हाधिकारी श्री. मांढरे यांनी दिली.


प्रशिक्षण वर्गाबाबत माहिती देताना प्रशिक्षण समन्वयक उपजिल्हाधिकारी गणेश मिसाळ यांनी सांगितले की, पाच दिवसीय असलेले प्रशिक्षण दोन भागात विभागले गेले आहे. पहिले दोन दिवस नियोजन सभागृहात तर उर्वरित 3 दिवस ऑनलाईन सत्र घेण्यात येणार आहे. यामध्ये उपजिल्हाधिकारी बबन काकडे, अरविंद अंतुर्लीकर, तहसीलदार अनिल दौडे, राहुल कोताडे, मंडळ अधिकारी सचिन जगताप, जे.डी.बंगाळे यांचे मार्गदर्शन प्रशिक्षणार्थींना लाभणार आहे. यात प्रामुख्याने तलाठी पदाची कर्तव्ये आणि जबाबदारी, खंड ४ गाव नमुने १ ते २१, वर्ग २ जमिनीची प्राथमिक माहिती तसेच फेरफार व इतर प्रत्यक्ष लॉगिन द्वारे होणारे कामकाज, पंचनामे, नैसर्गिक आपत्तीमध्ये तलाठी यांची भूमिका आदी बाबींचा समावेश असणार असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी श्री. मिसाळ यांनी दिली आहे.




0000000000

Comments

Popular posts from this blog

शासन प्रशासनाच्या उपाययोजनांमुळे जिल्ह्याची लवकरच कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल; ॲक्टीव्ह रुग्ण व घटणारा मृत्यूदर आशादायी : पालकमंत्री छगन भुजबळ

माजी राष्ट्रपती ए.पी.जे अब्दुल कलाम यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

कोरोना आपत्तीचे इष्टापत्तीमध्ये रूपांतर करण्यासाठी आपण सर्वच प्रयत्नशील : पालकमंत्री छगन भुजबळ