मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमातून योग्य उमेदवारांना लाभ मिळणे आवश्यक : जिल्हाधिकारी सूरज मांढरे

वृत्त क्र. C_380     दि.20 ऑक्टोबर 2020    
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमातून योग्य उमेदवारांना लाभ मिळणे आवश्यक
                                                         : जिल्हाधिकारी सूरज मांढरे
नाशिक, 20 ऑक्टोबर 2020 (जिमाका वृत्तसेवा) :
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अनेक ठिकणी नोकऱ्यांचा प्रश्न उद्भवला आहे. त्यामुळे रोजगार उपलब्ध होण्यासाठी राज्य शासनाच्या मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेतून योग्य उमेदवारांना लाभ मिळणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी केले.

ते जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात बँकर्स सोबत झालेल्या बैठकीत बोलत होते. यावेळी जिल्हा उद्योग केंद्र महाव्यवस्थापक सतीश भामरे, अग्रणी बँक व्यवस्थापक अर्धेंद्रु शेखर, जिल्हा उद्योग निरीक्षक सीमा पवार, प्रकाश घुगे आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना जिल्हाधिकारी श्री. मांढरे म्हणाले, तरुण वर्गाला रोजगार मिळण्याच्या अनेक वाटा आहेत; त्या त्यांच्या समोर आणल्या पाहिजे. या वाटा निवडताना त्यांना कोणत्या गोष्टी आपल्यामार्फत उपलब्ध करून देता येईल त्या सुलभ रीतीने उपलब्ध होणे देखील महत्त्वाचे आहे. तसेच अशा वेगळ्या वाटा चोखाळून ज्या तरुण-तरुणींनी आदर्श निर्माण केला आहे ती उदाहरणे जागोजागी प्रसिद्ध केली पाहिजे जेणेकरून इतर तरुण-तरुणी सुद्धा केवळ नोकरीच्या मृगजळामागे न धावता स्वतःच्या पायावर उभे राहतील. 

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम आखण्याचा राज्य शासनाचा उद्देश हाच आहे की, तरुणांमधील कौशल्याला वाव मिळून त्यातून त्याचा रोजगार सुरू व्हावा. या अनुषंगाने लाभार्थी निवडताना आपण काटेकोरपणे उमेदवाराची छाननी केली पाहिजे. यापूर्वी लाभ मिळालेल्या सर्व लाभार्थ्यांच्या यशकथा प्रसारित करून योजनेची प्रसिद्धी करण्यात यावी. त्यामुळे नवीन तरुणांना देखील या योजनेतून लाभ मिळण्याची शक्यता जास्त प्रमाणात असेल. 

बँकर्स आणि जिल्हा उद्योग केंद्र यांच्या माध्यमातून अनेक बेरोजगार तरुणांना योजनेचा लाभ घेऊन रोजगार उपलब्ध होण्यासाठी व्यवसाय सुरू करणे सोयीचे ठरेल असा विश्वास देखील यावेळी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी व्यक्त केला.
000000

Comments

Popular posts from this blog

शासन प्रशासनाच्या उपाययोजनांमुळे जिल्ह्याची लवकरच कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल; ॲक्टीव्ह रुग्ण व घटणारा मृत्यूदर आशादायी : पालकमंत्री छगन भुजबळ

माजी राष्ट्रपती ए.पी.जे अब्दुल कलाम यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

कोरोना आपत्तीचे इष्टापत्तीमध्ये रूपांतर करण्यासाठी आपण सर्वच प्रयत्नशील : पालकमंत्री छगन भुजबळ