यंदाचा नवरात्रोत्सव व्यक्तिगत स्वरूपात साजरा होणे आवश्यक : जिल्हाधिकारी सूरज मांढरे

*वृत्त क्र. 376*

*यंदाचा नवरात्रोत्सव व्यक्तिगत स्वरूपात साजरा होणे आवश्यक : जिल्हाधिकारी सूरज मांढरे*

नाशिक,16 ऑक्टोबर 2020 (जिमाका वृत्तसेवा)

आपल्या जिल्ह्यात कोरोनाची परिस्थिती सध्या नियंत्रणात जरी असली तरी तिचा उद्रेक कधी होईल हे सांगता येणे कठीण आहे; त्यामुळे यंदाचा नवरात्रोत्सव व्यक्तिगत स्वरूपात साजरा करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी केलेले आहे.

नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी श्री. मांढरे यांनी यंदाच्या नवरात्रोत्सवाचे स्वरूप आणि प्रशासकीय नियोजन यांची माहिती दिली. कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी सर्वच शासकीय यंत्रणा प्रयत्न करत आहेत. दरवर्षी नवरात्रोत्सवात भरणारी सप्तश्रृंगी देवीची यात्रा या वर्षी विश्वस्त, ग्रामस्थ आणि प्रशासन यांच्या सुसंवादातून रद्द करण्यात आली आहे. गडावर कावडी, ज्योत घेऊन जाणारे भाविक यांना यावर्षी गडावर येण्यास मनाई असल्याने त्यांनी येऊ नये; जर कोणी निघाले असतील तर जिथे असाल तिथून त्यांनी मागे फिरावे; आणि आपल्या गावी, घरी जाऊन देवकार्य करावे. गडावरील स्थानिक नागरिकांना पासेस दिले जाणार आहे; मात्र पासेसचा कोणी गैरवापर करेल त्यांच्यावर कायद्यानुसार कडक कारवाई केली जाणार आहे. स्थानिक तहसीलदार आणि पोलीस प्रमुख यांना घटना प्रमुख म्हणून नेमण्यात आलेले आहे, असे देखील जिल्हाधिकारी श्री मांढरे यांनी यावेळी बोलताना नमूद केले.

भाविकांनी कुठेही गर्दी होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. त्यासोबतच यंदाचा नवरात्रोत्सव आपण जर सार्वजनिक स्वरूपात न ठेवता व्यक्तिगत स्वरूपात ठेवला तर त्यामुळे कोरोना संसर्गाला आळा घालण्यास नक्कीच मदत होईल. सर्वांनी जर ही काळजी घेतली  पुढच्या वर्षीचा नवरात्रोत्सव आपण चांगल्याप्रकारे साजरा करू, असा विश्वास देखील जिल्हाधिकारी श्री. मांढरे यांनी व्यक्त केला.
0000000000

Comments

Popular posts from this blog

शासन प्रशासनाच्या उपाययोजनांमुळे जिल्ह्याची लवकरच कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल; ॲक्टीव्ह रुग्ण व घटणारा मृत्यूदर आशादायी : पालकमंत्री छगन भुजबळ

माजी राष्ट्रपती ए.पी.जे अब्दुल कलाम यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

कोरोना आपत्तीचे इष्टापत्तीमध्ये रूपांतर करण्यासाठी आपण सर्वच प्रयत्नशील : पालकमंत्री छगन भुजबळ