जिल्ह्यात पर्यावरण समतोल राखण्यासाठी माझी वसुंधरा योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी सर्वच स्तरातून प्रयत्न आवश्यक : जिल्हाधिकारी सूरज मांढरे
वृत्त क्र. C 349 दि.5 ऑक्टोबर 2020
जिल्ह्यात पर्यावरण समतोल राखण्यासाठी माझी वसुंधरा योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी सर्वच स्तरातून प्रयत्न आवश्यक
: जिल्हाधिकारी सूरज मांढरे
माझी वसुंधरा योजनेसाठी नोडल अधिकारी म्हणून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण विभागाचे प्रादेशिक अधिकारी अमर दुरगुळे यांची नेमणूक
नाशिक, 5 ऑक्टोबर 2020 (जिमाका वृत्तसेवा) :
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी नुकत्याच शुभारंभ केलेल्या माझी वसुंधरा योजनेची सुरुवात आपल्या जिल्ह्यात होत आहे. या योजनेच्या यशस्वीतेसाठी सर्वच यंत्रणांनी आपापल्या स्तरावर प्रयत्न करावेत, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी केले.
जिल्हाधिकारी यांचे दालनात झालेल्या "माझी वसुंधरा" योजनेच्या अंमलबजावणी बाबत झालेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, अपर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण विभाग प्रादेशिक अधिकारी अमर दूरगुळे, क्षेत्रीय अधिकारी संजीव रेदासनी, जिल्हा नियोजन अधिकारी योगेंद्र चौधरी आदी उपस्थित होते.
योजनेच्या नोडल अधिकारी म्हणून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण विभागाचे प्रदेशिक अधिकारी अमर दुरगुळे यांची नेमणूक जिल्हाधिकारी श्री मांढरे यांनी केली.
यावेळी बोलताना जिल्हाधिकारी श्री मांढरे म्हणाले, पृथ्वी, वारा, जल, अग्नी आणि आकाश या पंचतत्वांच्या संरक्षणासाठी आपल्याला माझी वसुंधरा या योजनेच्या माध्यमातून प्रयत्न करायचे आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी सर्वच स्तरातून प्रयत्न अपेक्षित आहे. जिल्हयातील नागरी भागामध्ये महानगरपालिका, नगरपालिका यांचा तर ग्रामीण भागामध्ये जिल्हापरिषद, पंचायत समिती यांचा सहभाग घेऊन त्याबाबत समिती स्थापन करण्यात येणार आहे. तसेच बिगरशासकीय संस्था, नागरी क्षेत्रातील औद्योगिक कंपन्या यांची देखील मदत या योजनेच्या अंमलबजावणी साठी घेतली जाणार असल्याचेही जिल्हाधिकारी श्री.मांढरे यांनी सांगितले आहे.
जिल्हा परिषदेकडून या योजनेच्या समन्वयासाठी श्री इशाधीन शेळकंदे यांची नियुक्ती मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती लीना बनसोड यांनी केली. जिल्हा परिषदेकडून सुरू असलेल्या सर्व उपक्रमांचा समावेश माझी वसुंधरा या कार्यक्रमांमध्ये करण्यात येईल व त्याची अत्यंत प्रभावी अंमलबजावणी करण्यात येईल असे या वेळेला त्यांनी प्रतिपादन केले.
0000



Comments
Post a Comment